जीएंच्या कथांमधील (अ)सामान्य माणसे – २ – दानय्या (तळपट)

तळपट कथेतील दानय्या हा सामान्य माणुस आहे का? खरं तर मला तो कुठल्याही तऱ्हेने सामान्य माणुस वाटत नाही. कधीकधी वाटतं जीएंनी सामान्य माणसांपेक्षा असामान्य माणसांवरच जास्त लिहिले आहे. जीएंच्या कथेतील तथाकथित सामान्यांमध्ये एक वेगळाच पीळ दिसून येतो. जो आपल्याला सर्वसाधारणपणे सगळीकडे दिसत नाही. ही माणसे दुःख सोसतात, नियतीशी झुंज घेताना हरतात. तरीही ज्या चिवटपणे ती झुंजतात त्यामुळे त्यांचा पराभवदेखील त्यांना कमीपणा आणत नाही. उलट त्या झुंजण्यानेच त्यांचे व्यक्तीमत्व उजळून जाते. म्हटलं तर दानय्या एक गारुडी. इतर गारुड्यांपेक्षा जास्त कौशल्य असलेला असे आपण म्हणुयात. नाग पकडायचे, त्यांचे प्रदर्शन करायचे आणि पैसे मिलवून आपला चरितार्थ चालवायचा हे त्याचे आयुष्य. पण हे आयुष्य सामान्य माणसाचे नाही.

तळपट कथेत सामान्य असेल तर दानय्याचे दूरचे नाते असलेला चंदर हा पोरगा आहे. त्याला साप पकडणे जमलेच नाही. तो भेदरला. आणि त्या वाटेला पुन्हा कधीही गेला नाही. त्याला त्या ऐवजी गवतकाम आवडते. आपल्याला एखादे काम जमले नाही की माणसे टोचणी जाण्यासाठी जसे त्याचे तत्वज्ञान बनवतात तसे चंदरचेही आहे. गवत चावत नाही, भारे टाकावे नी बिनघोर झोपावे असे तो म्हणतो. ते ऐकून दानय्या शरमतो. कारण तो जालिम विषारी नागांना ताब्यात ठेवणारा गारुडी आहे. त्याला गवताचे काम कमीपणाचे वाटते. दानय्याचे असामान्यपणे यात आहे. तो परिस्थितीशी तडजोड करणारा माणुस नाही.

मात्र दानय्याच्या मर्यादाही आहेत. तो संत नाही. त्याच्या हातून चोरी घडते. एखाद्याचा नाग चोरणे म्हणजे पाप. पकडल्या गेल्यास वस्तीत जागा नाही. एका घातक्षणी दानय्याच्या हातून हे पाप घडते आणि त्याला माणसे हकलून देण्यास सरसावतात. दानय्याला आपल्याला मिळालेली शिक्षा योग्यच वाटते. कारण हीच शिक्षा इतरांना देण्यात त्यानेही यापूर्वी भाग घेतलेला असतो. मात्र आपल्याला शिक्षा देण्यास जी माणसे सरसावलेली आहेत ती आपल्या बरोबरीची नाहीत याची त्याला खंत आहे आणि चीडही आहे. आपल्यासारकेह नाग कुणी पकडू शकणार नाही. तेवढे धैर्य कुणातही नाही. मात्र आपल्या हातून एक चुक घडल्याबरोबर हे सगळे शेळपट आपल्यावर तुटून पडले आहेत हे त्याला सलते आहे. मात्र तो निमुटपणे शिक्षा भोगून निघून जाणारा नाही. तो एक जबरदस्त नाग पकडून दाखवणार आहे आणि मगच तेथून निघून जाणार आहे. इथे मला दानय्या असामान्य वाटतो. आपण काय आहोत हे दाखवून देणारा.

पुढे जे काही घडते त्यातही दानय्याचे असामान्यपण आणि त्याच्या मर्यादा दाखवून देणारे. अतिशय दुर्मिळ नाग समोर येतो आणि त्यांच्यात झुंज होते. दानय्या हरला असेल पण तो नागालाही जिंकू देत नाही. किंवा दानय्या खरोखर हरला का हे देखील मला पडलेले कोडेच आहे. जातीवंत, दुर्मिळ, विषारी नाग दिसला आणि ज्याक्षणी दानय्याने त्याच्यावर ताबा मिळवला तोच त्याच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण. इथे दानय्या जिंकलाच. पुढे जे काही घडलं ते अनेक वर्षांच्या साचलेल्या भूतकाळातील घटनांचा तो परिपाक होता. दानय्या जिंकला हे बाहेर, त्याच्या वस्तीत कुणालाही कळले नसेल. पण मरताना दानय्याच्या मनात आपण जिंकल्याचेच समाधान असेल असे मला वाटते.

अतुल ठाकुर